परवाना नसताना रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 21:08 IST2021-06-30T18:19:30+5:302021-06-30T21:08:34+5:30
Two Bogus Doctors Arrested : ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

परवाना नसताना रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना अटक
कुरखेडा (गडचिराेली) : तालुक्यातील गेवर्धा येथे कोणताही वैद्यकीय व्यवसायाचा रितसर परवाना नसताना रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या दोन अनधिकृत डाॅक्टरांना कुरखेडा पोलिसांनीअटक केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
अटक केलेल्या त्या बोगस डॉक्टरांमध्ये हरोशित अभिलाष बिस्वास रा.मार्डी ता.मारेगाव जि.यवतमाळ (हल्ली मुक्काम गेवर्धा) आणि नासिर खान उस्मान खान पठान रा.गेवर्धा यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम ३३६, ४१९, ४२० अन्वये तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ चे कलम ३३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. ही कारवाई भरारी पथक प्रमुख तहसीलदार सोमनाथ माळी, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश दामले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, तसेच तहसील, आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.
उर्वरीत ३८ डॉक्टरांवर कारवाई केव्हा?
तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस डाक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. यापूर्वी मालेवाडा येथील एका अवैध वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जवळपास एक महिन्यापूर्वी एक पत्रक काढत ४० बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यातील केवळ दोन डॉक्टरांवर आता कारवाई झाली. त्या यादीतील उर्वरित ३८ डॉक्टरांवर कारवाई कधी होणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.