Two arrested who were cut a birthday cake with a sword by Film style | फिल्मी स्टाईलने तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या दोघांना अटक
फिल्मी स्टाईलने तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या दोघांना अटक

ठळक मुद्देअक्षय राणे (24, रा. मनोरमानगर, ठाणे)  आणि प्रथमेश शामसुंदर राणे या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.यातील दोघांवर आर्म अ‍ॅक्टनुसार तर उर्वरित दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे - फिल्मी स्टाईलने तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे परमेश्वर राठोड (32, रा. मनोरमानगर, ठाणे) या तरुणाला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी त्याच्यासह चौघांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील दोघांवर आर्म अ‍ॅक्टनुसार तर उर्वरित दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनोरमानगर येथे राठोड याच्या वाढदिवसानिमित्त 13 जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी राठोड याने तलवारीने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता. या भन्नाट कार्यक्रमाची मोबाईलवरील क्लिप ठाणे शहरात मोठया प्रमाणात व्हायरल झाली होती. शिवाय, त्याचे फेसबुक लाईव्ह देखील करण्यात आले होते. याचीच गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने 14 जानेवारी रोजी परमेश्वर राठोड आणि किरण धावडे (23, रा. दोघेही मनोरमानगर, ठाणे) या दोघांविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करुन त्यांना 15 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ही तलवारही जप्त करण्यात आली आहे. अक्षय राणे (24, रा. मनोरमानगर, ठाणे)  आणि प्रथमेश शामसुंदर राणे या दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Two arrested who were cut a birthday cake with a sword by Film style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.