एमडीसह कप सिरपची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:16 IST2024-12-16T19:16:11+5:302024-12-16T19:16:38+5:30
मुंब्य्रातील खर्डीकडून दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी पावडरच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

एमडीसह कप सिरपची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई!
ठाणे : मेफेड्रॉन (एमडी) पावडर आणि नशेच्या कोडीनयुक्त कप सिरपची तस्करी करणाऱ्या मोहम्मद अब्दुल रेहमान सय्यद उर्फ नॉडी, रा. खोणीगांव आणि नवाज शमशद्दीन पावले, रा. मुंब्रा, ठाणे या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून सात लाख ४३ हजार २२० रुपये किंमतीची पावडर तसेच तीन लाख ६३ हजारांचे कोडीनयुक्त कप सिरप औषध असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
मुंब्य्रातील खर्डीकडून दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी पावडरच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, उपनिरीक्षक दीपेश किणी, नितीन भोसले आणि राजेंद्र निकम आदींच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी खर्डीगाव येथील तलाव परिसरात मोहम्मद अब्दुल सय्यद उर्फ नॉडी याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ६०.३ ग्रॅम वजनाचा 'एम.डी. हस्तगत केले.
याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याला १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. त्याने हे एमडी कुठून मिळवले? याव्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या कारवाईमध्ये १२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.२५ वाजण्याच्या सुमारास डायघर भागातील कुल्हड चहा, वडापाव सेंटर कडून गणेश खिंडीमार्गे कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवाज शमशद्दीन पावले, रा. मुंब्रा, याला म्हस्के यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून कोडीनयुक्त कफ सिरप या औषधाच्या ७२० बॉटल्स हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली. त्याला १७ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.