'कारभारी लयभारी' या मालिकेतील गंगाला मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीला अटक
By पूनम अपराज | Updated: March 1, 2021 19:01 IST2021-03-01T18:59:19+5:302021-03-01T19:01:19+5:30
Crime News : २८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. याबाबत गंगाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

'कारभारी लयभारी' या मालिकेतील गंगाला मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीला अटक
मुंबई : तू कोणत्या समूहातील आहेस? तुझा गुरू कोण? असे प्रश्न विचारत झी मराठी वहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील गंगा हे पात्र साकारणाऱ्या प्रणित उर्फ गंगा संदीप हाटे (२७) या तृतीयपंथीयाला घाटकोपर परिसरात एका अनोळखी व्यक्तीने मारहाण करून तिचे ५०० रुपये हिसकावून पळ काढला. २५ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती सोशल मीडियावर एका व्हिडिओमार्फत शेअर झाली. तिने या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तृतीयपंथीला अटक केली आहे. आकाश दिलीप माटे (२९) असं आरोपीचे नाव असून घाटकोपर पूर्व येथील सट्टा गली नंबर एक कोकण वैभव चाळ कामराज नगर येथे राहतो.
गंगा २५ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मित्राला नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये सोडण्यासाठी घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील हायवेवर उभी हाेती. त्यावेळी तिला एका अनाेळख्या व्यक्तीने केस ओढून मारहाण केली. हल्लेखोर हा तृतीयपंथी होता. त्याने ‘तू एवढे मोठे केस का वाढवले? कोणत्या समूहातील आहेस? तुझा गुरू कोण?’ असे प्रश्न विचारून नंतर गंगाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचे केस हातात धरून जोरात ओढू लागला. गंगाच्या मित्राने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्या दोघांनी घटनास्थळाहून पळ काढला आणि रिक्षात बसल्यावर याचा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मुंबईपोलिसांनी या घटनेची दाखल घेऊन गंगाला रात्री २ वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षातून फोन केला आणि तक्रार दाखल करण्यास सांगितले गेले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. याबाबत गंगाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.