चाकूचा धाक दाखवून पीडितेवर केली बळजबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 21:04 IST2019-11-02T21:00:42+5:302019-11-02T21:04:52+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चाकूचा धाक दाखवून पीडितेवर केली बळजबरी
मुंबई - बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या ३६ वर्षीय आरोपीने तक्रारदार पीडितेवर चाकूच्या धाकावर पुन्हा बळजबरी केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात पुढे आला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी पंकज बाजीराव अहिरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चेंबूर येथील लाल डोंगर परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित तरुणीचे २०१२ मध्ये पंकजसोबत ओळख झाली होती. काही दिवसांनी दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी लग्नाचे आमिष दाखवून पंकजने पीडित तरुणीशी शारिरीक संबध ठेवले होते. मात्र, तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर पंकजने तिला लग्नास नकार दिला. पंकजने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात २०१३ मध्ये चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली. या गुन्ह्यात पंकज कित्येक वर्ष तुरूंगात शिक्षा भोगत होता. तसेच दुसरीकडे तरुणी घडलेला प्रकार विसरून पुन्हा तिच्या आयुष्यात रमली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकज हा शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीचा माग काढत ती कामाला असलेल्या ठिकाणी पोहचला.
कामावरून पीडित तरुणी घरी जात असताना मोबाइलवर मग्न असल्याचे पाहून पंकजने तिचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी पंकजला पाहून पीडित तरुणी घाबरली. पंकजने पीडितेच्या मोबाइलवरून स्वत:ला मिसकॉल देत तिचा नंबर मिळवला. नंतर पंकज वारंवार पीडितेची समजूत काढत लग्न करण्यासाठी पीडितेच्या मागे लागला. मात्र, पीडित तरुणीचा नकार कायम होता. तरुणीच्या या स्वभावाला कंटाळून पंकजने २५ नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी काम करत असलेल्या कुर्ला येथील पतपेढीजवळ तिला गाठले. त्यानंतर त्याने चाकूच्या धाकावर पीडितेला सोबत येण्यास भाग पाडले. पीडितेला घेऊन पंकज त्याच्या आरसीएफ कॉलनीत राहत्या घरी घेऊन आला. त्यावेळी त्याने तरुणीवर पुन्हा चाकु दाखवून अत्याचार करत तिला मारहाण केली. तसेच लग्नासाठी तयार न झाल्यास परिणाम वाईट होतील असे ही धमकावले. दरम्यान, पंकज बाथरूममध्ये शौचास गेल्याची संधी साधून तरुणीने कशीबशी पंकजच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. हा घडलेला प्रकार तिने घरातल्यांना सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी चेंबूर पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पंकजला अटक केली आहे. दुसऱ्यांदा आरोपीला अटक करण्यात आली आहे.