लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, नवी मुंबई : गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीच्या मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मीरा-भाईंदर कार्यालयाबाहेर गर्दी केली. तुर्भेत संतप्त गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयावर दगडफेकही केली.
कंपनीच्या दादर कार्यालयात टोरेस ब्रँड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न कंपनीसह त्याचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे यांच्यासह पाच जणांविरुद्ध १३ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजी विक्रेते प्रदीपकुमार मामराज वैश्य (३१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.
दादर येथील जे.के. सावंत मार्गावरील टोरेस वास्तू सेंटर इमारतीबाहेर सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी धडक दिली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवाजी पार्क पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. कंपनीच्या तुर्भेतील कार्यालयाबाहेरही गुंतवणूकदारांच्या संतप्त जमावाने दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्रलोभन दाखवून १३ कोटी कसे हडपले?
टोरेस कंपनीच्या संचालकांनी २१ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या कालावधीत प्लॅटिनम हर्न प्रा.लि. ही कंपनी आणि कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर, तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इन्जार्च व्हॅलेंटीना कुमार यांनी मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतविलेल्या रकमेवर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखविले. त्याला बळी पडून गुंतवणूकदारांनी १३ कोटी ४८ लाख १५ हजार रुपये गुंतविले, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
साखळी अशी वाढत गेली...
गुंतवणूकदार आणल्यास १० ते २० टक्के कमिशन मिळत असल्याने, गुंतवणूकदारांची साखळी वाढत गेली. अनेकांनी नातेवाईक, मित्रमंडळींना यात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूकदारांना फोनसह इतर महागड्या वस्तू भेट देऊन भुलविण्यात आले, असे सांगण्यात येते.
कंपनीने विकलेले सोने खरे की खोटे?
- तुर्भे येथील कार्यालयात कंपनीने विक्रीसाठी सोनेही ठेवले होते. कंपनीने गुंतवणूकदारांना सोनेही विकले. ते खरे की खोटे, असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे.
- मुंबई पोलिसांनी कंपनीच्या दादर शाखेवर कारवाई केल्याची माहिती मिळताच, गुंतवणूकदारांनी तुर्भे कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. एपीएमसी पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. फसवणूकप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.