सिंहगड रस्त्यावर थरार! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 22:51 IST2024-06-22T22:21:42+5:302024-06-22T22:51:06+5:30
गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा बचावला आहे.

सिंहगड रस्त्यावर थरार! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्युज नेटवर्क
धायरी: सिंहगड रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा थोडक्यात बचावला आहे. हि घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिरुची मॉलजवळ असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर दोन अल्पवयीन मुले बसली होती. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन तरूणांनी तिथे येऊन यातील एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्या अल्पवयीन मुलाने मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यांनतर ते हल्लेखोर तिथून पसार झाल्याची माहिती त्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितली आहे
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पाटील,पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
खरंच फायरिंग झाले का याबाबत साशंकता...
अल्पवयीन तक्रारदार मुलाने पोलिसांना दिलेली माहिती तसेच घटनास्थळी आरोपींनी गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्यानंतर पडणारी पुंगळी अद्यापपर्यंत आढळून आली नसल्याने खरंच फायरिंग झाली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांना लोकमत प्रतिनिधी ने माहिती विचारल्यानंतर तपास केल्यानंतरच काय ते समजेल, असे सांगण्यात आले.