२५ लाखांच्या अमली पदार्थासह तीन नायजेरियनना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:11 IST2021-07-03T19:00:11+5:302021-07-05T14:11:20+5:30
Crime News : कोकेन व गांजा असा २५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

२५ लाखांच्या अमली पदार्थासह तीन नायजेरियनना अटक
मीरारोड - मीररोडच्या हटकेश भागातील मंगल नगर पालिका भाजी मंडई जवळून पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेन व गांजा असा २५ लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या परिसरात कृष्णा इमारतीत नायजेरियन नागरिक अमली पदार्थाची तस्करी, सेवन, मद्यपान आदी गैरप्रकार सातत्याने करून उच्छाद मांडल्याच्या तक्रारी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी केल्या होत्या.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील व सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक पोलिस निरीक्षक बेंद्रे सह इंगळे, पाटील, राऊत, घरबुडे, श्रीवास्तव, जाधव यांच्या पथकाने सदनिकेवर धाड टाकून १०० ग्रॅम कोकेन, ६५५ ग्रॅम गांजा व ९,४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तीन नायजेरियन लोकांना अटक करून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकेनची आंतराष्ट्रीय बाजारात २५ लाख रुपये किंमत आहे.