मीरारोड टोरेस फसवणूक प्रकरणात तिघांना अटक; २६ लाखांची रक्कम हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:53 IST2025-01-10T21:53:45+5:302025-01-10T21:53:45+5:30
पोलिसांनी लखवानी व शेख ह्या दोघांकडून २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे

मीरारोड टोरेस फसवणूक प्रकरणात तिघांना अटक; २६ लाखांची रक्कम हस्तगत
धीरज परब
मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील टोरेस ज्वेलरी फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल केल्या नंतर नवघर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे .
रामदेवपार्कच्या अनंता एक्झोरिया इमारतीत भाड्याने उघडलेले टोरेस ज्वेलरी शोरूम फसवणूक प्रकरणी सोमवार ६ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कंपनीची बँक खाती व त्यातील ९ कोटी २४ लाखांची रक्कम गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आपले . गुरुवारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी आदींनी शोरुमची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला होता . उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी गुन्ह्याचा तपास करत आहेत.
मीरारोड टोरेस शोरुमची जागा ज्या तरुणीच्या नावाने भाड्याने घेण्यात आली होती त्या लक्ष्मी सुरेश यादव ( २३ ) हिला ताडदेव येथून अटक केली . तर शाखेचा व्यवस्थापक नितीन लखवानी ( ४७ ) रा . मालाड पश्चिम आणि रोखपाल मोहम्मद मोईजुद्दीन खालिद शेख ( ५० ) रा . मीरारोड ह्या दोघांना सुद्धा अटक केली गेली आहे . तिघांना शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे .
पोलिसांनी लखवानी व शेख ह्या दोघांकडून २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे . गुरुवार पर्यंत फसगत झालेल्या तक्रारदारांची संख्या ७६ इतकी झाली असून फसवणुकीची रक्कम १ कोटी ७ लाख रुपये पर्यंत गेली आहे. फसगत झालेले लोक जसे येतील तसे त्यांची तक्रार घेतली जात आहे असे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले .
मोजोनाईट स्टोन कित्येक पटीने महाग विकून ते खरेदी करणाऱ्यांना दर आठवड्याला बक्कळ बोनस चे आमिष दाखवत मीरारोडच्या शाखेत शेकडो लोकांची फसवणूक केली गेली आहे . फसगत झालेल्या लोकांची संख्या व फसवणुकीची रक्कम वाढत असून आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त फसगत झालेले लोक समोर आले आहेत . त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले .