ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: May 1, 2023 18:20 IST2023-05-01T18:20:39+5:302023-05-01T18:20:56+5:30
नऊ लाख ६० हजारांचे २४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे : ठाण्यतील किसननगर भागात मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी आलेल्या अमर तुसामकर (२९, रा. साठेनगर, वाल्मीकीपाडा, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून नऊ लाख ६० हजारांचे २४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातील वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथील सर्कल परिसरात एमडी पावडरच्या तस्करीसाठी एक कुख्यात तस्कर येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच आधारे २९ एप्रिल २०२३ रोजी सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, उपनिरीक्षक शिवाजी कानडे आणि जमादार सुनिल अहिरे आदींच्या पथकाने सापळा लावून अमर तुसामकर, मोहसिन शेख (३४, रा. किसननगर, ठाणे) आणि निहालुल सय्यद (३४, रा. किसननगर, ठाणे) या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून नऊ लाख ६० हजारांचा २४० ग्रॅम वजनाचा एमडी, रोकड, मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकल असा १४ लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. हे तिघेही किसननगर भागात मोठया प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती उघड होत असल्याचेही उपायुक्त पाटील यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
मुंबईच्या डोंगरी भागातून तस्करी
पकडलेल्या या एमडी पावडरची मुंबईतील डोंगरी भागातून तस्करी केली जात होती. मोहसिन शेख याच्याविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थांची विक्री केल्याचे गुन्हे दाखल असून तो पाच महिन्यांपूर्वीच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्याचेही पोलिसांनी सांगितले.