राहायला धुळ्यात, चोऱ्या जळगाव जिल्ह्यात, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 18:51 IST2022-03-15T18:50:58+5:302022-03-15T18:51:31+5:30
Crime News : गेल्या तीन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.

राहायला धुळ्यात, चोऱ्या जळगाव जिल्ह्यात, तिघांना अटक
जळगाव : धुळे शहरात वास्तव्य करून जळगाव जिल्ह्यात येऊन गुरे चोरणाऱ्या चौकडीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शाकीर शहा ऊर्फ पप्पू बंम इब्राहिम शहा (३१), सद्दाम ऊर्फ बोबड्या रशीद शेख (वय २०), नईम शहा सलीम शहा (वय २५) व सलमान ऊर्फ मन्या अन्सारी (सर्व रा. धुळे) अशी चौघांची नावे आहेत. मन्या वगळता तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी अमळनेर तालुक्यात गुरे चोरल्याची कबुली दिली आहे. जळगाव तालुक्यातील वडली, वावडदा व पाथरी या भागांतूनही गुरे चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे या भागातही यांनीच गुरे लांबविले आहेत की आणखी दुसरे चोरटे आहेत, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अश्रफ शेख, सुधाकर अंभोरे व विजय चौधरी यांनी ही कारवाई केली.