एटीएम कॅश व्हॅन लूटप्रकरणी तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:48 IST2020-11-18T23:48:50+5:302020-11-18T23:48:54+5:30
२५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी : रकमेसह मुद्देमाल जप्त

एटीएम कॅश व्हॅन लूटप्रकरणी तीन आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : सव्वाचार कोटींची कॅश असलेली व्हॅन घेऊन पळालेल्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला असून तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील ४ कोटी २३ लाख २९ हजारांची रक्कम जप्त केली आहे. आरोपींनी विकत घेतलेली बुलेट, मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. पकडलेल्या आरोपींना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला विरारच्या बोळिंज येथून महिंद्रा कोटक बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी कॅशव्हॅन आरोपी ड्रायव्हरने पळवून नेत सव्वाचार कोटींची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी ड्रायव्हर रोहित बबन आरू (२४), अक्षय प्रभाकर मोहिते आणि मुख्य आरोपीला राहण्यासाठी व पैसे ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ बाबूशा गायकवाड (४१) या तिघांना अटक केली आहे. अक्षयवर चेंबूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी याच्यावर मुंबई, ठाणे किंवा आजूबाजूच्या परिसरातील कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी केली जात असल्याचे डीसीपी संजयकुमार पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
दोन्ही आरोपींनी गांजा पिताना चेंबूरच्या पार्किंग लॉटमध्ये प्लॅन आखला होता. मुख्य आरोपीला वडील नसून तीन भाऊ असल्याने त्याला पैशांची चणचण होती. त्यामुळे ही चोरी केली होती. तसेच तो लेह लदाख किंवा जम्मू काश्मीरमध्ये सेटल होणार असल्याचे चौकशीत समोर आल्याचे काशिमीरा क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून ४ कोटी २८ लाख ७० हजार १०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ४० हजारांची बुलेट आणि १० हजारांचा मोबाईल जप्त केला आहे. ज्या मित्रांना या प्लॅनची माहिती दिली होती त्यांना साक्षीदार करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.