सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी; केवळ १५०० गुन्हे दाखल; कोरोनामुळे तपास थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 06:33 IST2020-07-24T01:42:43+5:302020-07-24T06:33:15+5:30

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

Thousands of complaints of cyber crimes; Only 1,500 cases filed; Corona cooled the investigation | सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी; केवळ १५०० गुन्हे दाखल; कोरोनामुळे तपास थंडावला

सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी; केवळ १५०० गुन्हे दाखल; कोरोनामुळे तपास थंडावला

- विवेक भुसे 

पुणे : सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारीत तिपटीने वाढ होत असताना राज्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मात्र त्या मानाने कमी आहे़ गेल्या ५ महिन्यांत १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले असून, केवळ ८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे़ सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्या या प्रामुख्याने परराज्यांतील असल्याने लॉकडाऊनच्या काळात प्रवासावरील बंधनांमुळे हा तपास जवळपास थंडावला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये काही हजारांपर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल आहेत़ मात्र, या सर्व तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक तेवढे बळ उपलब्ध नाही़ दुसरीकडे यातील सायबर चोरटे हे प्रामुख्याने नोएडा, दिल्ली, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या राज्यांतील असल्याने तेथे जाऊन त्यांच्या शोध घेऊन आरोपींना पकडणे हे अतिशय अवघड काम झाले आहे.

राज्यात सायबर गुन्हेगारीमध्ये डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक विचारून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे़ याशिवाय फसवणुकीचे वेगवेगळे  फंडे वापरून सायबर चोरटे नागरिकांना ऑनलाईन लुबाडताना दिसत आहेत़ गेल्या वर्षी २०१९ मध्ये राज्यात ४ हजार ६२२ सायबर गुन्हे दाखल झाले होते, तर २०१८ मध्ये ३ हजार ५११ गुन्हे दाखल झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यांत सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ मात्र, त्याचा प्राथमिक तपास केल्यानंतर या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले जातात़ कोरोनामुळे पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी
झाले आहे़ गेल्या ५ महिन्यांत राज्यात १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे जानेवारीमध्ये ४२० दाखल झाले होते़ त्यापैकी ३५ गुन्हे उघड होऊन ४७ आरोपींना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे.

ऑनलाइन फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीत प्रामुख्याने डेबिट/क्रेडिट कार्ड क्लोनिंग, ऑनलाईन
खरेदी करून फसवणूक, ओटीपी शेअर करायला लावून फसवणूक, हनीट्रॅप,
सोशल मीडियावर बदनामी, वाहन खरेदीत फसवणूक, फेसबुक हॅकिंग, जॉब फ्रॉड,
गिफ्ट फ्रॉड, अशा प्रकारे गुन्ह्यांचे स्वरूप आहे.

Web Title: Thousands of complaints of cyber crimes; Only 1,500 cases filed; Corona cooled the investigation