तळोज्यात दोन एटीएमवर मारला चोरट्यांनी डल्ला; लाखो रुपये लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 21:17 IST2018-11-06T21:17:12+5:302018-11-06T21:17:28+5:30
एमआयडीसी आणि खारघरमधील पाडा भागातील युनियन बँकेचे दोन एटीएम मशिन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली.

तळोज्यात दोन एटीएमवर मारला चोरट्यांनी डल्ला; लाखो रुपये लंपास
पनवेल - दिवाळी सणाची लगबग सुरु असताना चोरट्यांनी तळोज्यामधील दोन एटीएमवर डल्ला मारला आहे. सोमवारी रात्री तळोजा येथील एमआयडीसी आणि खारघरमधील पाडा भागातील युनियन बँकेचे दोन एटीएम मशिन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली.
हे दोन्ही एटीएम मशिन्स एकाच टोळीने फोडले असून याप्रकरणी खारघर व तळोजा पोलिसांनी अज्ञात टोळीवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या टोळीचा शोध सुरु केला आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर लुटारुंनी दोन एटीएम मशिन्स फोडून लाखोंची लूट केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.दिवाळीनिमित्त रहिवासी गावी जात असतात. नेमकी याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा डाव साधला असल्याचे बोलले जात आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत असून रहिवाश्यांना सुरक्षेसंदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.