कुकरने डोक्यात प्रहार, तिथेच आंघोळ अन् शेवटी...; पैशांसाठी चोरट्यांनी केली ५० वर्षीय महिलेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:03 IST2025-09-11T15:47:25+5:302025-09-11T16:03:29+5:30
हैदराबादमध्ये चोरट्यांनी महिलेच्या घरात घुसून तिची हत्या करुन चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कुकरने डोक्यात प्रहार, तिथेच आंघोळ अन् शेवटी...; पैशांसाठी चोरट्यांनी केली ५० वर्षीय महिलेची हत्या
Hyderabad Crime: हैदराबादच्या सायबराबाद भागात एका खळबळजनक घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले. हैदराबादमध्ये चोरट्यांनी एका महिलेची तिच्याच घरात प्रेशर कुकरने हल्ला करुन हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. हत्येनंतर चोरट्यांनी घरातील वस्तू चोरुन नेल्या. यादरम्यान आरोपींनी महिलेच्याच घरात आंघोळ देखील केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात यामागे नोकराचा हात असण्याची शक्यता आहे.
रेणू अग्रवाल या ५० वर्षीय महिलेची तिच्याच घरात निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबर रोजी सायबराबाद परिसरातील स्वान लेक अपार्टमेंटमध्ये घडली. मृत रेणू अग्रवालतिच्या पती आणि मुलासह अपार्टमेंटच्या १३ व्या मजल्यावर राहत होती. घटना घडली त्यावेळी महिला घरात एकटीच होती. सकाळी महिलेचा २६ वर्षीय मुलगा आणि पती ऑफिसला गेले होते. त्यानंतर दोन्ही चोर घरात घुसले.
बुधवारी संध्याकाळी बराच वेळ दार वाजवून, हाक मारूनही रेणू यांनी दरवाजा उघडला नाही, तेव्हा मुलगा आणि पतीने प्लंबरच्या मदतीने दरवाजा उघडला. घरातील प्रकार पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. रेणू यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला होता. त्यांचे हात आणि पाय बांधलेले होते आणि त्यांच्या डोक्यावर प्रेशर कुकरने वार करण्यात आले होते. त्यांच्या मानेवर चाकू आणि कात्रीच्या खोल जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
चोरट्यांनी रेणू यांच्या डोक्यात कुकरने प्रहार केला होता आणि नंतर कात्रीने त्यांचा गळा कापला. सीसीटीव्हीमध्ये दोन आरोपी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. चोरट्यांनी घरातून ४० ग्रॅम सोने आणि १ लाख रुपये रोख रक्कम लुटल्याचे उघड झाले. हत्येनंतर चोरट्यांनी घरातच आंघोळ केली, त्यांचे रक्ताने माखलेले कपडे तिथेच सोडून दिले आणि दुसरे कपडे घालून तिथून पळ काढला.
दरम्यान, पोलिसांना घरात काम करणारा हर्ष आणि १४ व्या मजल्यावर काम करणारा रोशन यांच्यावर संशय आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही दिसले होते. तेव्हापासून दोघेही बेपत्ता आहेत. हर्ष १० दिवसांपूर्वी रेणूच्या घरी कामावर आला होता. दोघेही हैदराबादहून पळून रांचीला गेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस अपार्टमेंटमधील इतर लोकांची चौकशी करत आहेत.