चोरट्यांनी शोधला ऑनलाइन गंड्याचा नवा फंडा, अशाप्रकारे मारताहेत बँक अकाऊंटवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:11 IST2018-10-16T16:10:41+5:302018-10-16T16:11:15+5:30
ऑनलाइन गंडा घालण्याचा नवा फंडा चोरट्यांनी शोधून काढला आहे.

चोरट्यांनी शोधला ऑनलाइन गंड्याचा नवा फंडा, अशाप्रकारे मारताहेत बँक अकाऊंटवर डल्ला
मुंबई - ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी वन टाइम पासवर्ड प्रणाली ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या प्रणालीला भेदण्याचा मार्गही चोरट्यांनी आता शोधून काढला आहे. चोरट्यांनी चलाखी करून बँक खातेदारांकडून वन टाइम पासवर्ड मिळवल्याची तसेच त्यांचा स्मार्टफोन हॅक करून त्यांचा पासवर्ड चोरल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
आतातर ऑनलाइन गंडा घालण्यासाठी बँक खातेदारांचा ओटीपी मिळवण्यासाठी चोरट्यांनी वी क्लुप्ती शोधून काढली आहे. ते आता संबंधित बँकांच्या शाखेत जाऊन आपणच खरे खातेदार असल्याचे सांगून मोबाइल नंबर बदलून घेत आहेत. तसेच मोबाइल नंबर बदलल्यानंतर ओटीपी प्राप्त करून बँक खाती रिकामी करत आहेत.
दिल्लीतील जनकपुरी परिसरात असा प्रकारसमोर आला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार ऑनलाइन गंड्याचा हा नवा फंटा वापरत बदमाशांनी सुमारे 11.30 लाखांचा गंडा घातला आहे. 31 ऑगस्ट रोजी दोघे जण बँकेंत आले. त्यातीस एकाने आपण अमूक एका खात्याचे खातेदार असल्याचे सांगितले. तसेच या खात्याचा मोबाइल नंबर बदलण्यासाठी त्याने आग्रह धरला. तसेच त्यासाठी आवश्यक असलेला फॉर्मही त्याने भरला.
त्यानंतर खऱ्या खातेदाराचा मोबाइल नंबर बदलून त्यांचा नंबर अॅड होताच मिळालेल्या ओटीपीच्या आधारे चोरट्यांनी लाखो रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात वळवले.