लग्न सोहळ्याला गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, जळगावमध्ये घडला प्रकार
By सागर दुबे | Updated: March 20, 2023 20:48 IST2023-03-20T20:48:00+5:302023-03-20T20:48:36+5:30
७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना

लग्न सोहळ्याला गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, जळगावमध्ये घडला प्रकार
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: उमर कॉलनी येथे लग्न सोहळ्याला गेलेल्या शेख अकील शेख सलीम यांच्या शिवाजी नगरामधील बंद घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शेख अकील शेख सलीम हे शिवाजीनगरातील मिर्झा चौक येथे आई-वडील, बहिणी, भावासोबत वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारच्यांकडे लग्न सोहळा असल्यामुळे शेख कुटुंबीय रविवारी दुपारी दीड वाजता घर बंद करून उमर कॉलनी भागातील लग्नात जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास शेख कुटूंबिय घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट सुध्दा उघडे दिसले. तर त्याच्यातील ७० हजार रूपयांची रोकड चोरीला गेल्याची दिसून आली. रात्री शेख यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.