मीरारोडमधील घरात आईच्या दागिन्यांची चोरी पण संशय अनेकांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:50 IST2023-08-10T17:49:59+5:302023-08-10T17:50:44+5:30
मीरारोडच्या हॅपी होम इस्टेटमध्ये विद्या पेवेकर वृद्ध आई वनिता पालवणकर यांच्यासोबत राहतात.

मीरारोडमधील घरात आईच्या दागिन्यांची चोरी पण संशय अनेकांवर
मीरारोड - मीरारोडमध्ये आई आणि मुलगी राहत असलेल्या घरातील दागिने चोरीला गेल्या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या कालावधीत विविध कामासाठी अनेकजण घरात येऊन गेल्याने त्यांच्यावर फिर्यादीने संशय व्यक्त केला आहे.
मीरारोडच्या हॅपी होम इस्टेटमध्ये विद्या पेवेकर वृद्ध आई वनिता पालवणकर यांच्यासोबत राहतात. वनिता यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने २३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल केले होते व विद्या रुग्णालयात असायच्या. वनिता यांच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, चैन, कर्णफुले असे ४८ ग्रॅम वजनाची १ लाख ८२ हजारांचे दागिने विद्या यांनी २३ रोजी घरातील कपाटात ठेवले होते.
८ ऑगस्ट रोजी आई वनिता यांनी विद्याकडे सोन्याचे कानातले मागितले असता कपाटातले सर्वच दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात घरातल्या साफसफाईसाठी एका ऍप वरून मागवले दोन कर्मचारी दिनेश शिंदे आणि सागर निंगरवले तर बेसिन दुरुस्ती साठी अन्य दोन अनोळखी कामगार आले होते. लोखंडी कट बसवण्यासाठी एक कामगार तर एके दिवशी वनिता यांच्या सेवेसाठी परिचारिका सोनिया गुंडे आल्या होत्या. यापैकी कोणीतरी कपाट उघडून त्यातील दागिने चोरल्याचा संशय विद्या यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.