पर्वरीत पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणीस अटक, न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:14 IST2024-01-23T13:14:13+5:302024-01-23T13:14:31+5:30
याप्रकरणी संशयित आफ्रिन मेहबूब शेख (२५, रा. भोम, फोंडा) या तरुणीला अटक केली.तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पर्वरीत पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणीस अटक, न्यायालयीन कोठडी
- शेखर वायंगणकर
पर्वरी : पुंडलिकनगरमधील नियोजन आणि सांख्यिकी कार्यालयानजीक एका जोडप्याला हटकणाऱ्या पोलिसांना संबंधीत तरुणीने धक्काबुक्की करून अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांच्या जीपवर दगडफेकही केली. याप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी संशयित आफ्रिन मेहबूब शेख (२५, रा. भोम, फोंडा) या तरुणीला अटक केली.तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुंडलिक नगरमध्ये शनिवारी एक तरुण जोडपे अश्लील चाळे करीत असल्याचा संदेश पर्वरी पोलिस स्थानकात आला होता. यावेळी पोलिस रॉबर्ट जीप घेऊन घटनास्थळी गेले. त्यांनी त्या युगलाला तेथून जाण्यास सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या संशयित युवतीने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद सावंत आणि पार्सेकर यांना धक्काबुक्की केली. त्या संशयित युवतीने प्रसाद मांद्रेकर यांचा मोबाईल हिसकावून घेऊन खाली फेकला. पोलिसांच्या जीपसह मोबाईलचे नुकसान केले.
पोलिसांनी याप्रकरणी संशयित आफ्रिन हिला ताब्यात घेतले आहे. तिच्यावर भा.दं.सं. कलम ३५३, ५०४, १८६, ४२७ या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मदन तारी तपास करीत आहेत.