बँकेच्या एटीएमचे ३ कोटी रुपये पळवणारा एका दिवसात गजाआड, नालासोपाऱ्यातून व्हॅन चालकाच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:30 IST2022-09-07T13:30:24+5:302022-09-07T13:30:46+5:30
सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबात जवळपास १० ते १५ जणांचा समावेश असून, एटीएम रक्कम चोरीतही त्यांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे.

बँकेच्या एटीएमचे ३ कोटी रुपये पळवणारा एका दिवसात गजाआड, नालासोपाऱ्यातून व्हॅन चालकाच्या मुसक्या आवळल्या
मुंबई: युनियन बँकेच्या गोरेगाव परिसरातील एटीएममध्ये भरण्यासाठी व्हॅनमधून आणलेली जवळपास ३ कोटी रुपयांची रोकड घेऊन व्हॅनचा चालक उदयभान सिंग (३४) हा सोमवारी पसार झाला. याप्रकरणी कसून तपास करत सोमवारी रात्रीच नालासोपारा परिसरातून उदयभानच्या मुसक्या आवळण्यात परिमंडळ ११ च्या पथकाला यश मिळाले. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याचे अख्खे कुटुंब यामध्ये सामील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबात जवळपास १० ते १५ जणांचा समावेश असून, एटीएम रक्कम चोरीतही त्यांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा आणि परिमंडळ ११ चे पोलीस उपयुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथकांची नियुक्ती करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिंग हा गोरेगाव रेल्वेस्थानकावरून अंधेरी, दादर, असे करत पुन्हा वेगवेगळे स्थानक बदलत नालासोपाऱ्याला पोहोचला. यादरम्यान त्याने तीन रिक्षादेखील बदलल्या. मात्र, पोलीस पथक त्याच्या मागावर होते आणि अखेर उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली. त्याने पत्नीसोबत मिळून २०१४ मध्ये कस्तुरबा पोलिसांच्या हद्दीत साडेसहा कोटींचे हिरे चोरले होते. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असून, चोरीला गेलेली रक्कमदेखील परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बँकेने पार्श्वभूमी पडताळली का?
सिंग हा अभिलेखावरील गुन्हेगार असूनही युनियन बँकेने त्याला एटीएमसारख्या संवेदनशील विभागात नोकरी कशी दिली? त्यांनी त्याची पार्श्वभूमी पडताळली का? त्याला याठिकाणी कोणी रुजू केले? असे अनेक प्रश्न आता या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
‘कानून के लंबे हाथ’ पोहोचलेच!
- सिंग हा कुटुंबीयांसह गुन्ह्यांचादेखील म्होरक्या आहे. हवाला, बँक एटीएमसारख्या करोडोंचे व्यवहार होणाऱ्या ठिकाणी नोकरी करत त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर संधी साधत त्याठिकाणी डल्ला मारत पसार व्हायचे, अशी त्याची कार्यपद्धती आहे. यासाठी पत्नी, मुले आणि भावंडे या सर्वांना प्रशिक्षण दिले आहे.
- त्यांचे मोबाइल काढून घेत भाडेतत्त्वावरील घरही दोन आठवड्यांपूर्वीच रिकामे करून पत्नी व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवले. पकडले गेल्यावरही ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांना काय सांगायचे याचीही तयारी त्याने कुटुंबीयांकडून करून घेतली हाेती.
- नालासोपारा परिसरातच चार दिवस थांबून नंतर पसार होणार होता. पण ‘कानून के लंबे हात’ त्याच्यापर्यंत पोहोचलेच.