वाहतूक पोलिसाला एक ते दीड किलोमीटर फरफटत नेले; वसईतील वसंत नगरी येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 22:47 IST2023-02-13T22:46:41+5:302023-02-13T22:47:37+5:30
गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी गाडीच्या बोनेटवर पडले तरी देखील वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली.

वाहतूक पोलिसाला एक ते दीड किलोमीटर फरफटत नेले; वसईतील वसंत नगरी येथील धक्कादायक घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा (मंगेश कराळे) :- सिग्नल तोडणार्या वाहनचालकाने गाडी थांबविण्याच्या प्रयत्न करणार्या वाहतूक पोलिसाला एक ते दीड किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना वसईत रविवारी घडली आहे. गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी गाडीच्या बोनेटवर पडले तरी देखील वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. या प्रकारात चौधरी जखमी झाले असून माणिकपूर पोलिसांनी वाहन चालक जाफर सिद्दीकी याला अटक केली आहे.
रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वसई पुर्वेच्या वसंत नगरी सिंग्नल येथे ही घटना घडली या भागात वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी नियंत्रण करण्याचे करीत होते. याच दरम्यान वाहन क्रमांक (यूपी. ३२ डीजे ७७०७) या वाहन चालकाने सिग्नल तोडले होते. त्यावेळी वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी यांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु वाहनचालकाने गाडी न थांबवता चौधरी यांना घडक दिली. चौधरी वाहनचालकाला थांबवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत गाडीच्या बोनेटवर चढले आणि गाडीच्या काचेच्या मधल्या जागेत पकडले. मात्र, चालकाने कार न थांबवता तशीच पुढे गोखिवराच्या दिशेने नेली. वसई रेंज नाका येथे इतर गाड्या पुढे आल्याने अखेर ती कार थांबली. परंतु, यावेळी दीड किलोमीटरच्या अंतरात चौधरी कारच्या बोनेटवरच होते. गोखिवर्यात वाहनांच्या गर्दीमुळे गाडी थांबली आणि चौधरी यांची सुटका झाली.
आरोपी वाहनचालकाला जाफऱ सिद्दीकी (१९) याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३०७, ३०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चौधरी थोडक्यात बचावल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.