लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:18 IST2025-12-22T11:18:02+5:302025-12-22T11:18:30+5:30
वडिलांनी सर्वांसमोर ओरडल्याचा मुबसिरला प्रचंड राग आला. वडिलांचे बोलणे त्याच्या मनाला इतके लागले की...

AI Generated Image
ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजत होते, पाहुण्यांची लगबग सुरू होती आणि नवरी मुलगी आपल्या होणाऱ्या पतीची वाट पाहत होती, तिथेच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. किरकोळ कारणावरून वडिलांनी ओरडल्यामुळे संतापलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील नूंह जिल्ह्यात घडली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रोजका मेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिठौडा गावात राहणाऱ्या मुबसिर (२३) याचे रविवारी लग्न होते. शनिवारी रात्री घरात मेंदीचा कार्यक्रम सुरू होता. मुबसिरने आपल्या लग्नासाठी खास डीजे मागवला होता. बराच वेळ डीजेच्या तालावर नाचगाणे सुरू होते. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे घरातील काही मोठ्या मंडळींनी आक्षेप घेतला. मुबसिरचे वडील अहमद यांनीही सर्वांसमोर त्याला कडक शब्दांत फटकारले आणि डीजे बंद करायला लावला.
खु़शाल चेंडू स्वभावाचा मुबसिर टोकाच्या निर्णयापर्यंत गेला
वडिलांनी सर्वांसमोर ओरडल्याचा मुबसिरला प्रचंड राग आला. वडिलांचे बोलणे त्याच्या मनाला इतके लागले की, मेंदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तो गुपचूप आपल्या खोलीत गेला. रविवारी सकाळी त्याची वरात निघणार होती, मात्र त्याआधीच त्याचा मृतदेह घराशेजारील शेतातील एका लोखंडी प्लॅटफॉर्मला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
लग्नाच्या घरात शोककळा
लग्नाची तयारी पूर्ण झाली असतानाच मुबसिरच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नवरी मुलीच्या घरीही आनंदाचे वातावरण होते, पण जेव्हा त्यांनी हे वृत्त ऐकले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. ज्या घरातून वरात निघणार होती, तिथे आता मुबसिरच्या अंत्ययात्रेची तयारी करण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिली माहिती
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असून, प्राथमिक तपासात डीजेच्या वादातून वडिलांनी दिलेल्या फटकारामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.