चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:08 IST2026-04-10T16:07:31+5:302026-04-10T16:08:24+5:30
अहमदाबादच्या चांदखेडा येथील दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता मुलाच्या हट्टापायी झालेल्या हत्येच्या दिशेने सुरू आहे. घरात सापडलेल्या डायरीने उघडले अनेक गुपिते

चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
अहमदाबादच्या चांदखेडा येथील प्रजापती कुटुंबातील दोन चिमुरड्या मुलींच्या मृत्यूने संपूर्ण गुजरात हादरले आहे. सुरुवातीला 'फूड पॉयझनिंग' वाटणाऱ्या या घटनेत आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या एका डायरीने या मृत्यूचे गूढ आणखी वाढवले असून, मुलाच्या हट्टापायी या मुलींचा बळी दिला गेला का? असा संशय आता बळावला आहे.
डायरीतील 'तो' मजकूर अन् पोलिसांना धक्का
तपासादरम्यान पोलिसांना घरात एक डायरी सापडली आहे. ही डायरी मुलींची आई भावना प्रजापती हिची असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या डायरीमध्ये 'पुत्रप्राप्ती'च्या तीव्र इच्छेचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे. पहिल्या मुलीनंतर दुसरे अपत्य मुलगाच हवा होता, अशी भावना त्यात व्यक्त करण्यात आली आहे. या खुलाशानंतर पोलीस आता या कोनातून तपास करत आहेत की, मुलगा होत नाही या नैराश्यातून किंवा रागातून या चिमुरड्यांना संपवण्यात आले का?
एफएसएल रिपोर्टने 'डोसा थिअरी' नाकारली
यापूर्वी कुटुंबीयांनी दावा केला होता की, बाहेरून आणलेल्या डोशाचे पीठ खाल्ल्यामुळे मुलींची प्रकृती बिघडली. मात्र, फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुलींचा मृत्यू अन्नाच्या विषबाधेमुळे नाही, तर सल्फाससारख्या तीव्र विषारी कीटकनाशकामुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. घरातही सल्फासच्या गोळ्या सापडल्याने संशयाची सुई पालकांकडे वळली आहे.
मेडिकल स्टोअर आणि सीसीटीव्हीवर नजर
या कुटुंबाचे स्वतःचे मेडिकल स्टोअर आहे. त्यामुळे हे विष कुठून आले, याचा स्रोत शोधण्यासाठी क्राईम ब्रांचने मेडिकल स्टोअरचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. वडील विमल प्रजापती याच्या जीवनशैलीवरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. तो मॉडेलिंगमध्ये रस घेत होता आणि ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत होता. आर्थिक विवंचना, करिअरची महत्त्वाकांक्षा आणि मुलाची ओढ या सर्व गोष्टींनी मिळून हा गुन्हा घडला का? याचा तपास सुरू आहे.
२५ जणांचे जबाब नोंदवले
पोलिसांनी आतापर्यंत शेजारी, नातेवाईक आणि डेअरी कर्मचाऱ्यांसह २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. आई-वडिलांच्या फोनचे कॉल डिटेल्स देखील मागवण्यात आले आहेत. सध्या विमल आणि भावना रुग्णालयात असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर होणारी चौकशी या प्रकरणातील सत्य समोर आणण्यास मदत करेल.