घरातील सदस्य छतावर झोपले, चोरट्यांनी घर साफ केले

By विलास गावंडे | Updated: May 29, 2023 20:55 IST2023-05-29T20:55:04+5:302023-05-29T20:55:18+5:30

कात्री येथे लग्नघरी चोरी : रोख सव्वालाखासह दागिने लंपास

The members of the house slept on the roof, the thieves cleared the house | घरातील सदस्य छतावर झोपले, चोरट्यांनी घर साफ केले

घरातील सदस्य छतावर झोपले, चोरट्यांनी घर साफ केले

विलास गावंडे, कळंब (यवतमाळ): कुटुंबातील सर्व सदस्य छतावर झोपले असल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख एक लाख ३० हजार रुपयासह सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी तालुक्यातील कात्री येथे उघडकीस आली. धनराज कृष्णाजी झलके यांच्या घरी ही चोरी झाली. २२ मे रोजी त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले होते.

रविवारी रात्री धनराज झलके यांच्यासह सर्व सदस्य घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपायला गेले. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी कुलूप तोडून कपाट फोडले. त्यात ठेवून असलेले एक लाख ३० हजार रुपये, चार तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल लंपास केला. सकाळी खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. 

मुलीच्या लग्नाकरिता लागलेल्या साहित्याचे व इतर कामाचे पैसे चुकता करण्यासाठी धनराज झलके यांनी ही रक्कम घरी आणली होती. चोरट्यांनी त्यावर हात मारला. या घटनेची तक्रार कळंब पोलिसात करण्यात आली. पाचारण करण्यात आलेले श्वान जागीच घुटमळले. घटनास्थळावरून फिंगर प्रिंट घेण्यात आले. अधिक तपास कळंब पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: The members of the house slept on the roof, the thieves cleared the house

टॅग्स :Goldसोनं