नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक घटना बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी पतीचा मृतदेह पोत्यात भरून घरापासून २० किलोमीटर दूर फेकून दिला. मात्र, या गुन्ह्यानंतर तिने जे पाऊल उचलले, ते पाहून खुद्द पोलीसही अवाक झाले आहेत. ही महिला स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आणि ओरडून सांगू लागली, "मी माझ्या पतीला संपवलंय, आता मला जेलमध्ये पाठवा!"
नेमकं प्रकरण काय?
पूर्णियामधील राधानगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय सुनीता देवीचे तिचे पती उमेश कुमार सिंह यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. बुधवारी या वादाने इतके रौद्र रूप धारण केले की, सुनीताने धारदार शस्त्राने उमेश यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने मृतदेह एका पोत्यात भरला आणि २० किमी दूर असलेल्या अमौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेऊन फेकून दिला.
पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण
या हत्येचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा सुनीता स्वतः चालत पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांसमोर तिने आपला गुन्हा कबूल केला. "मी माझ्या पतीला मारून टाकलंय, मला अटक करा आणि जेलमध्ये टाका," असे ती पोलिसांना सांगत होती. तिचे हे बोलणे ऐकून पोलीसही काही वेळ सुन्न झाले. तातडीने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तपासाची चक्रे फिरवली.
रक्ताने माखलेलं घर अन् पोत्यात मृतदेह
दुसरीकडे, उमेश यांचा मुलगा पीयूष जेव्हा सकाळी घरी पोहोचला, तेव्हा त्याला घराच्या जमिनीवर, व्हरांड्यात आणि उशीवर रक्ताचे डाग दिसले. वडील घरात नसल्याने त्याने आरडाओरडा केला. स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले. त्याच वेळी अमौर पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस पोते सापडले होते, ज्यामध्ये उमेश यांचा मृतदेह आढळून आला. कुटुंबाने फोटोंवरून त्यांची ओळख पटवली.
दिराने उघडले हत्येचे गुपित
या हत्येमागचे कारण आर्थिक वाद असल्याचे समोर येत आहे. उमेश यांचा भाऊ महेश याने सांगितले की, उमेशने पत्नी सुनीताच्या नावावर ग्रुप लोन घेतले होते. या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी उमेश वारंवार पत्नीकडे पैशांची मागणी करत होते. याच पैशांच्या वादातून संतापलेल्या सुनीताने पतीचा काटा काढला.
सहकाऱ्यांचा शोध सुरू
सदर एसडीपीओ राजेश कुमार आणि पोलीस निरीक्षक ज्ञान रंजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. एकटी महिला मृतदेह २० किमी दूर नेऊन फेकू शकत नाही, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या गुन्ह्यात सुनीताला आणखी कोणी मदत केली? याचा तपास पोलीस करत आहेत.