नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:59 IST2025-04-29T09:59:01+5:302025-04-29T09:59:28+5:30
पोलिसांनी वेळ न दवडता अवघ्या १२ मिनिटांमध्ये सांताक्रुझ येथील घटनास्थळ गाठत त्या व्यक्तीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यापासून वाचवले

नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
पणजी - जुने गोवे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अवघ्या १२ मिनिटांमध्ये आपले आयुष्य संपविण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना रविवारी, दि. २७ रोजी सांताक्रुझ भागात घडली.
या व्यक्तीला पणजी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मानसिक आजार कायद्याअंतर्गत दिलेल्या निर्देशांनुसार, पुढील मानसिक उपचारांसाठी पोलिसांनी बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात पाठविले आहे. पोलिसांनी वेळेत हालचाल करून आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याची तयारी करणाऱ्या या व्यक्तीला वाचविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री १०:२४ वाजता सांताक्रुझ येथील एक व्यक्ती त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचा फोन कॉल जुने गोवे पोलिसांना पणजी नियंत्रण कक्षातून आला. फोन कॉल येताच जुने गोवे पोलिसांनी वेळ न दवडता अवघ्या १२ मिनिटांमध्ये सांताक्रुझ येथील घटनास्थळ गाठत त्या व्यक्तीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यापासून वाचवले. संबंधित व्यक्ती घरात एकटाच राहात होता. त्यामुळे नैराश्यात गेला होता.
नैराश्य आल्याने घेतला होता निर्णय
ही व्यक्ती घरात एकटीच राहात होती. पत्नी व मुलीपासून वेगळा राहात असल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आले. पोलिस वेळेत पोहोचले नसते तर कदाचित त्याने त्याचे जीवन संपवले असते. जुने गोवे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने मनोरुग्ण इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.