मुलाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याचा केला खून, संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
By सुरेंद्र राऊत | Updated: September 27, 2022 19:58 IST2022-09-27T19:57:01+5:302022-09-27T19:58:31+5:30
संजय बडदे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुलाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याचा केला खून, संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
यवतमाळ - शहरातील मुलकी परिसरात मुलाचा व एका युवकाचा वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पित्यावरच आरोपीने चाकूने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संजय किसन बडदे (५५) रा. मुलकी असे मृताचे नाव आहे. संजय बडदे यांच्या मुलाचा संशयित अमोल खेड (२४) रा. रामकृष्णनगर याच्याशी वाद झाला. अमोल हा बडदे यांच्या मुलाला मारण्यासाठी दोन वेळा घरावर चालून आला. त्याची समजूत काढून परत पाठविण्यात आले. मात्र अमोलच्या डोक्यातील राग शांत झाला नाही. तो धारदार चाकू घेवून पुन्हा बडदे यांच्या घरापुढे आला. त्यावेळी संजय बडदे हे अमोलची समजूत घालण्यासाठी आले असता त्याने बडदे यांचा गळा दाबून चाकूने वार केले.
संजय बडदे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. लगेच चौकशी करीत संशयित अमोल खेड याला ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय बडदे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अवधूतवाडी पोलीस ठाण्यात सुरू होती.