'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:22 IST2025-07-13T15:21:52+5:302025-07-13T15:22:34+5:30
टेनिसपटू राधिकाची तिच्याच जन्मदात्या वडिलांनीच हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडील दीपक यादवला अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्यानुसार, राधिका यादव हत्या प्रकरणात पोलीस तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची चौकशी करत आहेत.

'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
टेनिसपटू राधिका यादवची हत्या होऊन चार दिवस उलटले. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी तिच्या वडिलांना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. राधिकाच्या मैत्रिणीने तिच्या हत्येबद्दल मोठा खुलासा केला आहे. राधिकाची मैत्रीण हिमांशिकाने सांगितले आहे की, जेव्हा मी राधिकाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबाला भेटलो तेव्हा मला कळले की गेल्या तीन दिवसांपासून तिच्या घरात तिच्या हत्येचा कट रचला जात होता. १० जुलै रोजी मी वर्कआउट करत होते, त्यादरम्यान मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन येतो. मी फोन उचलू शकत नाही, त्यानंतर मला एक मेसेज येतो यामध्ये लिहिले आहे की राधिकाची तिच्या वडिलांनी हत्या केली आहे. मला वाटले की ही माझी मैत्रीण राधिका नसेल. मी राधिकाला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही.
Radhika Yadav : राधिका यादवचं अकाउंट कोणी केलं डिलीट? अचानक 'गायब' झाल्याने वाढलं पोलिसांचं टेन्शन
हिमांशिकाने सांगितले की, जेव्हा मी नंतर राधिकाच्या बहिणीला फोन केला तेव्हा तिला या घटनेची माहिती मिळाली. ज्यावेळी मी राधिकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा मला कळले की तिचे वडील गेल्या तीन दिवसांपासून तिला मारण्याचा कट रचत होते. तिच्या वडिलांनी हत्येच्या उद्देशाने पिस्तूल मागवली होती. हत्येपूर्वी तिच्या वडिलांनी राधिकाच्या आईला दुसऱ्या खोलीत बंद केले होते. तर राधिकाच्या भावाला काही कामासाठी जाणूनबुजून घराबाहेर पाठवण्यात आले होते.
राधिकाला मारताना कोणीही वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेवून, तिच्या वडिलांनी राधिकाच्या पाळीव कुत्र्याला मुद्दाम बाहेर ठेवले होते जेणेकरून तो राधिकाला कोणत्याही प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न करू शकणार नाही.
स्वत:चा बाप मुलीवर गोळ्या झाडेल का?
हिमांशिका म्हणाली की, तिच्या वडिलांनी तिच्यावर पाच गोळ्या झाडल्या हे ऐकून मला धक्का बसला. कोणत्या बापाने आपल्या मुलीवर पाच गोळ्या झाडल्या असत्या? ती कोणत्या प्रकारची व्यक्ती होती?