टेम्पोचा धक्का लागला म्हणून कारचालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
By प्रशांत माने | Updated: September 12, 2022 15:35 IST2022-09-12T15:34:41+5:302022-09-12T15:35:36+5:30
घटना घडताच आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

टेम्पोचा धक्का लागला म्हणून कारचालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कारचालकाने दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री पावणेनऊच्या दरम्यान सोनारपाडा, शंकरानगर नेपच्यून हॉस्पिटलमागे घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर कारचालक आणि त्याच्या अन्य तीघा साथीदारांवर दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उंबार्ली परिसरात राहणारे हर्षद रसाळ यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे काका बंडू रसाळ हे रविवारी रात्री सोनारपाडा शंकरानगर येथे टेम्पोतून मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्या टेम्पोचा अन्य एका कारला धकका लागला. कारला टेम्पोचा धकका लागल्याच्या कारणावरून कारचालक पंडित म्हात्रे यांनी वाद घालायला सुरूवात केली. यावेळी म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी टेम्पोत असलेल्या हर्षद रसाळ आणि अन्य एकाला शिवीगाळी करीत मारहाण केली. मारहाण करणारे त्यावरच थांबले नाहीत तर त्यातील म्हात्रे यांनी हर्षदच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. त्यातील विकास मिश्रा हा हर्षदला सोडविण्यासाठी पुढे आला असता त्याच्या देखील पायावर वार करून त्याला सुध्दा गंभीर जखमी करण्यात आले. दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडताच आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.