सध्या अनेक राज्यांमधून 'लुटेरी दुल्हन'ची वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत. आता राजस्थानमधून देखील असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मात्र, यात ही 'लुटेरी दुल्हन' स्वतःच अडकली आहे. खुद्द नवऱ्यानेच दरोडेखोर नवरीचा पर्दाफाश केला आहे. नवरी सुहागरात्रीच्या दिवशीच कांड करणार होती, पण नवरदेव तिच्यापेक्षाही हुशार निघाला. त्याने मित्रांनाच पहिल्या रात्रीच घरी बोलावले आणि जसे नवरीला न्यायला तिचे नातेवाईक आले, तसे नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी त्यांची जोरदार धुलाई केली.
नेमकं काय घडलं?किशनगढ रेनवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादवा गावात एक नवरदेव मोठ्या उत्साहात नवरीला घरी घेऊन आला होता. पण ही नवरी 'लुटेरी दुल्हन' गँगची सदस्य निघाली. सुहागरात्रीच्या दिवशीच ती नवरदेवाला चुना लावून पळण्याच्या तयारीत होती. पण नवरदेवाला आधीच संशय आला. त्याने आधीच आपल्या काही मित्रांना घरी बोलावून घेतले. जसे, नवरीचे साथीदार तिला न्यायला आले, तसे नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी त्यांना पकडले आणि झाडाला बांधून जबरदस्त मारहाण केली.
पोलिसांची एंट्री आणि गोंधळ
या घटनेची माहिती कोणीही पोलिसांना दिली नव्हती. पण मारहाणीमुळे ओलीस ठेवलेले लोक इतके ओरडत होते की, पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा नवरदेवाने सांगितले, "साहेब, हे माझ्या पत्नीचे नातेवाईक आहेत. ती माझ्या घरातून सामान घेऊन यांच्यासोबत पळून जाणार होती." तर, नवरीने लगेच पलटवार करत म्हटले, "हे माझे नातेवाईक नाहीत. मी त्यांना ओळखतही नाही." या दोन्ही पक्षांपैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
पळून जाण्याच्या तयारीत होती नवरी?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना मारहाण करण्यात आली, ते रात्री गाडीतून आले होते. नवरदेवाने सांगितले, "नवरी पळून जाण्याच्या पूर्ण तयारीत होती. पण लग्नाच्या काही तासांनंतर कोणता नातेवाईक नवरीला न्यायला येऊ शकतो, असा मला संशय आला. त्यामुळे मी मित्रांना आणि काही गावकऱ्यांना घरी बोलावले." मात्र, नवरीचा दावा आहे की, ती त्या लोकांना ओळखत नाही. आता नवरदेव आणि नवरीच्या लग्नाचे काय झाले, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पोलीस करत आहेत तपास
पोलिसांनी सांगितले, "आम्ही मारहाण झालेल्या चार लोकांचे वैद्यकीय तपासणी केली आहे. ते या गावातील नाहीत. प्रकरण संशयास्पद वाटत आहे. दोन्ही पक्षांपैकी कोणीही तक्रार दिलेली नाही. तरीही आम्ही संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत."