लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:40 IST2025-08-13T16:39:46+5:302025-08-13T16:40:18+5:30
एका पित्याने NEET परीक्षा पास केल्यामुळे आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
देशभर ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात असताना, गुजरातमध्ये एका पित्याने NEET परीक्षा पास केल्यामुळे आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देतात.
गुजरातच्या बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका चौधरीने NEET प्रवेश परीक्षेत ४७८ गुण मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता मिळवली होती. तिला पुढे शिक्षण घेऊन स्वतंत्रपणे जगायचं होतं, पण तिच्या वडिलांना आणि काकाला हे मान्य नव्हतं. त्यांनी २५ जून २०२५ रोजी चंद्रिकाला दुधात गुंगीचे औषध मिसळून दिलं आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.
मुलीला शिक्षण द्यायचं नव्हतं कुटुंबाला
पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रिकाच्या काकाने, शिवरामने, गावातील लोकांना सांगितलं की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता. पोलिसांनी शिवरामला अटक केली आहे, तर चंद्रिकाचे वडील सेंधा अद्याप फरार आहेत. चंद्रिकाचा मित्र हरेश चौधरी याने सांगितलं की, चंद्रिकाचे काका शिवराम अनेक महाविद्यालयांमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मुलं-मुली एकत्र शिकताना पाहिलं होतं. त्यांनी चंद्रिकाच्या वडिलांना सांगितलं की तिला तिथे पाठवू नका, कारण ती एखाद्या मुलाच्या प्रेमात पडेल आणि लग्न करेल. यानंतर त्यांनी चंद्रिकाचा फोन काढून घेतला आणि सोशल मीडियापासून दूर राहून फक्त घरकाम करायला सांगितलं.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव
हरेशने गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर सुनावणी होण्याच्या काही दिवस आधीच चंद्रिकाची हत्या झाली, ज्यामुळे या पूर्वनियोजित हत्येचा पर्दाफाश झाला. फेब्रुवारी महिन्यात तिची आणि हरेशची भेट झाली होती. पोलिसांनुसार, चंद्रिकाच्या कुटुंबीयांनी घाईघाईत तिच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आणि पोस्टमार्टम न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.