सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:01 IST2025-11-06T16:00:47+5:302025-11-06T16:01:19+5:30
आज मी माझा भाऊ गमावला, जर आपण आता योग्य पावले उचलली नाहीत तर उद्या दुसऱ्या कोणाला तरी याच संकटाचा सामना करावा लागू शकतो असं तिने सांगितले.

सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
अरूणाचल प्रदेशच्या पूर्व सियांग येथील सैनिकी शाळेत ७ वी मधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याची बहीण मिस अरुणाचल ताडू लूनियाने व्हिडिओ जारी करून शाळा प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत. माझ्या १२ वर्षीय भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एका सीनिअर स्टुडेंटने त्याला टॉर्चर केले होते असा दावा बहिणीने केला आहे. विद्यार्थ्याने आत्महत्या केली असा शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे तर या घटनेमागे काही तरी लपवले जात आहे असा दावा कुटुंबाने केला आहे.
सीनिअर विद्यार्थ्यांनी केले शारीरिक शोषण?
लुनियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिच्या भावाला न्याय मिळावा अशी विनंती केली. पोस्टमध्ये लुनियाने म्हटलं आहे की, शाळेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मुलाने आत्महत्या केली आहे असं कुटुंबाला सांगितले. पण त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांशी आणि वसतीगृहातील मित्रांशी बोलल्यानंतर आम्हाला कथित रॅगिंग आणि शारीरिक शोषणाची माहिती मिळाली. माझ्या भावाच्या वसतिगृहातील मित्रांनी सांगितले,३१ ऑक्टोबरच्या रात्री इयत्ता दहावीमधील आठ आणि इयत्ता आठवीमधील ३ विद्यार्थी रात्री ११ वाजल्यानंतर सातवीच्या वसतीगृहात घुसले. तेथे कोणीही वॉर्डन किंवा अधिकारी उपस्थित नव्हते. सीनिअर विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला वगळता इतरांना ब्लँकेटने तोंड झाकण्यास भाग पाडले आणि नंतर त्याला एकट्याला दहावीच्या वसतीगृहात नेले असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या बहिणीने केला आहे.
'त्या' बंद दारामागे काय घडले?
या व्हिडिओमध्ये लूनिया रडत रडत तिचं म्हणणं मांडत आहे. माझ्या भावाला झोपू दिले जात नव्हते. दीर्घ वेळ मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. त्या बंद दारामागे काय घडले हे कोणालाही माहिती नाही असं एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील लोकांनी या न्यायाच्या लढाईत कुटुंबासोबत उभे राहावे असं आवाहन लूनियाने केले आहे. आज मी माझा भाऊ गमावला, जर आपण आता योग्य पावले उचलली नाहीत तर उद्या दुसऱ्या कोणाला तरी याच संकटाचा सामना करावा लागू शकतो असं तिने सांगितले.
दरम्यान, पोलिस तपासात शाळा प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १९४ अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणात आता आत्महत्येस प्रवृत्त करणे यासारखे गंभीर आरोप समाविष्ट करण्यात आले आहेत. आठ अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक करून ४ नोव्हेंबर रोजी पासीघाट येथील बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) हजर करण्यात आले आणि त्यांना एका आठवड्यासाठी शाळेच्या उपप्राचार्यांकडे ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तपास सुरू आहे आणि पुढील पुरावे गोळा केले जात आहेत असं पोलिसांनी सांगितले.