मुलानेच वृद्ध आईला छडीने काढले फोडून; रक्ताने माखलेल्या तीन काठ्या हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:15 IST2022-06-06T07:14:25+5:302022-06-06T07:15:13+5:30

crime news : पोलिसांनी घटनास्थळाहून अशा तीन मोडलेल्या आणि रक्ताने माखलेल्या काठ्या हस्तगत केल्या असून, आराेपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

The boy himself took out the old mother with a stick and broke it; Grabbed three sticks stained with blood | मुलानेच वृद्ध आईला छडीने काढले फोडून; रक्ताने माखलेल्या तीन काठ्या हस्तगत

मुलानेच वृद्ध आईला छडीने काढले फोडून; रक्ताने माखलेल्या तीन काठ्या हस्तगत

मुंबई : माहिममध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. ज्यात जन्मदात्या ६५ वर्षांच्या आईला तिच्या पोटच्या मुलाने लाकडाच्या काठीने  फोडून काढले. पोलिसांनी घटनास्थळाहून अशा तीन मोडलेल्या आणि रक्ताने माखलेल्या काठ्या हस्तगत केल्या असून, आराेपीला बेड्या ठोकल्या आहेत. 
माहिम पश्चिमच्या जहागीरबाग येथील खोली क्रमांक ५५ मध्ये हा प्रकार घडला. याठिकाणी जेसन जोसेफ मास्करेन्हस (३६) हा त्याची आई इनाशिन मास्करेन्हस (६५) यांच्यासोबत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री जेसन याने त्याची आई इनाशीन यांना लाकडाच्या काठीने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर तुटलेल्या काठीच्या तुकड्यांनीही त्यांच्यावर वार करत त्यांना रक्तबंबाळ करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जेसनचे आईसोबत संपत्तीवरून वाद सुरू आहेत. जखमी इनाशीन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घटनास्थळी रक्ताचे डाग असलेल्या व तुटलेल्या ३ लाकडी काठ्या सापडल्या आहेत. त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. आम्ही आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी करत आहोत, असे कदम यांनी सांगितले.

Web Title: The boy himself took out the old mother with a stick and broke it; Grabbed three sticks stained with blood

टॅग्स :Mumbaiमुंबई