चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले अन् झाला स्फोट; महिला गंभीर जखमी
By विलास गावंडे | Updated: August 5, 2022 19:11 IST2022-08-05T19:10:44+5:302022-08-05T19:11:38+5:30
Blast Case : ही घटना तालुक्यातील सावंगा पेरका येथे घडली. या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले अन् झाला स्फोट; महिला गंभीर जखमी
यवतमाळ : शेतात निंदणाकरिता गेलेल्या महिलेला चेंडूच्या आकाराची वस्तू आढळली. हा चेंडू तिने लहान मुलाला खेळण्यासाठी आणला. घरी आणून त्यावर गरम पाणी ओतले असता स्फोट होऊन महिलेच्या अंगठा तसेच तर्जनी बोटाला गंभीर जखम झाली. ही घटना तालुक्यातील सावंगा पेरका येथे घडली. या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पेरकी सावंगा येथील मनोरमा गजानन बेडदेवार या गावातील एकनाथ फुलकार यांच्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. निंदणाच्या ओळीत त्यांना चेंडूच्या आकाराची वस्तू आढळली. हा चेंडू लहान मुलांना खेळण्याकरिता होईल म्हणून घरी आणला. तो साफ व्हावा या उद्देशाने त्यांनी चेंडू अंगणात ठेवून त्यावर गरम पाणी ओतले असता अचानक त्या चेंडूचा स्फोट झाला. या स्फोटात मनोरमा यांच्या डाव्या हाताचा अंगठा तसेच तर्जनी बोटाला गंभीर इजा झाली आहे. शेतातील डुकरांना मारण्याकरिता अज्ञात इसमाने गावठी बॉम्ब तयार केला असावा आणि तो शेतामध्ये ठेवला असावा, असा अंदाज असून या प्रकरणी सचिन भानुदास अंकतवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.