भिवंडीत दानपेटी चोरणाऱ्या आरोपीच्या पाच तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:02 IST2022-07-28T20:51:08+5:302022-07-28T21:02:20+5:30
Crime News : पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे चौकशी करीत नजीकच्या वडूनवघर या गावातून संतोष पाटील यास संशयाने ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दानपेटी चोरी केल्याचे कबूल केले.

भिवंडीत दानपेटी चोरणाऱ्या आरोपीच्या पाच तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भिवंडी: तालुक्यातील वडघर या गावात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे.घटनेच्या अवघ्या पाच तासात तालुका पोलिसांनी बातमीदाराच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत वडूनवघर या गावातून आरोपीस ताब्यात घेतले आहे .
भिवंडी खारबाव रस्त्यावरील वडघर या गावात श्री साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साईबाबा मंदिर उभारण्यात आलेले आहे.या ठिकाणी पंचक्रोशीतील अनेक साईभक्त दर्शनासाठी येत असतात.या मंदिरात असलेली लोखंडी स्टीलची दानपेटी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली. गुरुवार असल्याने दर्शनासाठी सकाळी लवकर आलेल्या भक्तांच्या लक्षात ही बाब आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ भिवंडी तालुका पोलीस ठाण्यास कळवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील, राजेंद्र लाडकर, देवीसिंग परमार यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील साई भक्तांसोबतच ग्रामस्थांकडे चौकशी केली असता पहाटेच्या सुमारास एक सफेद रंगाची नंबर प्लेट नसलेली ऍक्टिवा दुचाकी मंदिर परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे चौकशी करीत नजीकच्या वडूनवघर या गावातून संतोष पाटील यास संशयाने ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दानपेटी चोरी केल्याचे कबूल केले.
या दानपेटीचे कुलूप चोरट्याला उघडता न आल्याने त्याने ती दानपेटी रस्त्याकडेच्या एका शेतात गवतामध्ये फेकून दिली होती.पोलिस आरोपीस त्या ठिकाणी घेऊन जाताच आरोपीने गवतात फेकून दिलेली दानपेटी पोलिसांनी हस्तगत करत संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.