कुऱ्हाड घेऊन आरोपी पोलीस ठाण्यात पोहचला; गुन्हा कबुल करताना पोलीसही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:45 IST2022-10-31T14:45:36+5:302022-10-31T14:45:54+5:30
परतूर शहरातील धक्कादायक घटना, प्रतीक्षा यांना तत्काळ परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

कुऱ्हाड घेऊन आरोपी पोलीस ठाण्यात पोहचला; गुन्हा कबुल करताना पोलीसही हादरले
जालना- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना परतूर शहरातील सावतानगर भागात रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयित आरोपी हा हातात कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, त्यामुळे पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रतीक्षा मिलिंद पाडेवार (२२) असे मयत महिलेचे नाव आहे.
परतूर शहरातील स्वप्ननगरी भागातील सावतानगर येथे किरायाने पत्र्याच्या शेडमध्ये संशयित मिलिंद पाडेवार (२५) हा पत्नी प्रतीक्षासोबत राहतो. मिलिंद हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये नेहमी वादावादी होत होती. रविवारी सकाळीदेखील पती-पत्नीमध्ये वादावादी झाली होती. दुपारच्यावेळी पत्नी कोणासोबत फोनवर बोलत होती. तेवढ्यात मिलिंदने पाठीमागून येऊन कुऱ्हाडीने सात ते आठ वेळा वार केले. त्यानंतर आरोपी मिलिंद हा हातात कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
दरम्यान, प्रतीक्षा यांना तत्काळ परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी घरमालक शेख मुसा यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे करत असल्याची माहिती ठाणे अमलदार अशोक गाढवे यांनी दिली.