अपहरण झालेली मुलगी सापडली, १२ तासांच्या आत वाडा पोलिसांनी केली सुरक्षित सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:22 PM2022-08-14T13:22:32+5:302022-08-14T13:22:50+5:30

वाडा तालुक्यातील ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेत घरात ही मुलगी सापडली असून पोलिसांनी एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

The abducted girl was found, within 12 hours the Wada police made her safe | अपहरण झालेली मुलगी सापडली, १२ तासांच्या आत वाडा पोलिसांनी केली सुरक्षित सुटका 

अपहरण झालेली मुलगी सापडली, १२ तासांच्या आत वाडा पोलिसांनी केली सुरक्षित सुटका 

Next

वाडा/कुडूस : वाडा शहरातील अशोकवन भागातील  सोसायटीतील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे (वय ११) अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६.०० च्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास वाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत लावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तातडीने मुलीची सुरक्षित सुटका करणाऱ्या वाडा पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाडा तालुक्यातील ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेत घरात ही मुलगी सापडली असून पोलिसांनी एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी यावेळी एक कार सुद्धा जप्त केली असून समीर श्याम ठाकरे  (वय ३०, रा. ऐनशेत) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी सकाळी वाडा पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. उर्वरित आरोपीही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ही मुलगी वाडा येथील पी. जे. हायस्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असून शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरी येत होती. तिच्या मैत्रिणी घरी गेल्यानंतर ही मुलगी अशोक वनातील बिल्डिंगमधील तिच्या घरी जात असताना सायंकाळी ६ च्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिचे तोंड दाबून धरले आणि त्यांच्या कारमध्ये घालून  मुलीला घेऊन पसार झाले होते. या दरम्यान मुलगी जोरात ओरडल्याने काहीतरी विपरीत घडल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले, मात्र तोपर्यंत अपहरणकर्ते मुलीला घेऊन पसार झाले होते. 
याप्रकरणी वाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तपास करीत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली. मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुरक्षित सुटका  केल्याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या पथकाने यशस्वी तपास केला.

यांनी केला तपास
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली स. पो. निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या पथकाने तपास केला.

सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास
वाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तपास करीत आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली. मुलीची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुरक्षित सुटका  केल्याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
 

Web Title: The abducted girl was found, within 12 hours the Wada police made her safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.