ठाण्यात गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:18 IST2018-12-18T21:18:21+5:302018-12-18T21:18:55+5:30
ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली.

ठाण्यात गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी
ठाणे: ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
विजय आणि त्याचे दोघे साथीदार किसननगर येथील एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात एका विषयावर चर्चा सुरु होती. त्याचवेळी त्यांच्यापैकीच एकाच्या हातून रिव्हॉल्वरमधून गोळीबार झाला. यातील गोळी विजयच्या पोटाला लागली असून त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडे ही रिव्हॉल्व्हर नेमकी कशी आली?
तिचा परवाना आहे का? गोळी झाडण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. हा गोळीबार अनावधानाने झाल्याचेही बोलले जात आहे. परंतू, यातील सर्वच बाबींचा तपास सुरु असल्यामुळे यातील तपशील देण्यास श्रीनगर पोलिसांनी नकार दिला.