पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:15 IST2025-07-29T13:14:11+5:302025-07-29T13:15:13+5:30
या खोलीत १०० हून अधिक बिअरच्या खाली बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. खोलीत चालायलाही जागा नव्हती असं कर्मचाऱ्याने सांगितले.

पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
बँकॉक - अलीकडच्या काळात सगळीकडेच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्यात थायलँड येथे हृदयद्रावक घटना समोर आली. याठिकाणी पत्नीने पतीला घटस्फोट दिला मात्र पत्नीचा विरह पतीसाठी जीवघेणा ठरला आहे. पत्नी सोडून गेल्याने पती दु:ख सहन झालं नाही, त्यामुळे त्याने जेवणही सोडून दिले. ३० दिवसांपर्यंत तो फक्त बिअर पिऊन जगला. मात्र अखेर दुर्दैवाने त्याचा अंत झाला.
थायलँडच्या रेयोंग प्रांतातील बान चांग जिल्ह्यातील ही घटना आहे. या मृत पतीचे नाव थावीसाक नामवोंगसा असं आहे. थावीसाक याचा १६ वर्षीय मुलगा जेव्हा शाळेतून घरी पोहचला तेव्हा एका खोलीत वडिलांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. त्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावली. मात्र तोवर खूप उशीर झाला होता. थावीसाकला रुग्णालयात नेण्यात आले जिथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माहितीनुसार मुलाने जे पोलिसांना सांगितले त्याने कुणाचेही डोळे पाणावतील. तो म्हणाला की, आईशी घटस्फोटानंतर पप्पा पूर्णपणे मनातून निराश झाले होते. मी रोज त्यांना जेवण बनवून द्यायचो परंतु अन्नाचा एक घासही ते खात नव्हते. ते दिवस रात्र फक्त बिअर पित राहायचे असं त्याने सांगितले. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वडिलांना पाहून मुलाने रुग्णवाहिका बोलावली. त्यावेळी तिथे पोहचलेल्या रेस्क्यू टीमने खोलीतील दृश्य पाहिले तर धक्कादायक होते. या खोलीत १०० हून अधिक बिअरच्या खाली बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. खोलीत चालायलाही जागा नव्हती असं कर्मचाऱ्याने सांगितले.
बाटल्या सर्व ठिकाणी पडल्या होत्या, काही बेडजवळ, काही कोपऱ्यात तर काही बेडखाली होत्या. खोलीत पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. थावीसाकने या बाटल्यांच्या ढीगाऱ्यात चालण्यापुरती थोडीशी जागा ठेवली होती असं रेस्क्यूसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने म्हटले. तर घटस्फोटानंतर थावीसाक गंभीर नैराश्येत गेले होते. दारूला त्यांनी आधार बनवला होता. त्यांच्या मृत्यूचं कारण पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर पुढे येईल. परंतु सुरुवातीच्या तपासात खूप प्रमाणात दारू प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचं गांभीर्य म्हणजे मानसिक संतुलन ढासळणे आणि एकटेपणाशी लढत असणाऱ्या व्यक्तींना भावनिक आधाराची किती गरज असते हे या प्रकारातून दिसून येते.