पुण्यात टोळक्यांची पुन्हा दहशत; फुलेनगर परिसरात ७ ते ८ वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 22:52 IST2021-02-28T22:51:53+5:302021-02-28T22:52:46+5:30
हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दगडाच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवली.

पुण्यात टोळक्यांची पुन्हा दहशत; फुलेनगर परिसरात ७ ते ८ वाहनांची तोडफोड
पुणे - पुण्यात पुन्हा एकदा अज्ञात तरूणांनी वाहनाची तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, येरवडा फुले नगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.
हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दगडाच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवली. अनेक दोन तरुण या घटनेत जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. जखमी तरुणांना उपचारासाठी येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फुलेनगर सोसायटी परिसरातील हनुमान मंदिर, महात्मा फुले उद्यान तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची टोळक्याने मोडतोड केली आहे. याच परिसरात दारू गांजा पिण्यासाठी बाहेरून मुले येत असतात. निर्मनुष्य ठिकाणी ही मुले दारू गांजा पिऊन गोंधळ घालत असतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची मोडतोड करीत दोन तरुण गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.