आळेफाटा येथे दहा लाखांच्या बनावट नोटा देत ठगविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:26 IST2018-10-24T20:20:56+5:302018-10-24T20:26:20+5:30
शंभर रुपयांच्या सुट्टया नोटा देण्याचे आमिष दाखवून खोट्या नोटा देवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द फिर्याद दाखल झाली आहे.

आळेफाटा येथे दहा लाखांच्या बनावट नोटा देत ठगविले
आळेफाटा : शंभर रुपयांच्या सुट्टया नोटा देण्याचे आमिष दाखवत खोट्या नोटा देवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नामदेव मोरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांना निवडणुकीकरिता शंभर रूपयांच्या सुट्टया नोटा देण्याच्या बदल्यात दिलेल्या रकमेच्या वीस टक्के ज्यादा रक्कम देण्याचे आमिष काही व्यक्तींनी दाखवले. त्यानुसार मोरे यांनी दहा लाख रक्कम आळेफाटा बसस्थानकात सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर संबंधितांना दिली. त्या बदल्यात त्यांना एका बॅगमध्ये सुट्टया नोटा असल्याचे सांगितले. काही वेळातच मोरे यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये दोनशे रूपयांच्या खोट्या नोटांचे दहा ते बारा बंडल दिसले. वर नोटा आणि खाली कोरे कागद असे हे बंडल होते.
दरम्यान त्यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठत फसवणूक झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने बसस्थानक गाठत काही जणांना ताब्यात घेतले. यानंतर यामध्ये सहभागी असलेल्या इतरांची नावे पुढे आली. एकूण दहा जणांना याप्रकरणी ताब्यात घेत मंगळवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश ऊगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे अधिक तपास करत आहे.
=====