ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:04 IST2025-07-20T13:03:44+5:302025-07-20T13:04:54+5:30
७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
अंबिका प्रसाद कानुनगो
लोकमत न्यूज नेटवर्क
भुवनेश्वर : ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात एका गावात मैत्रिणीकडे निघालेल्या एका किशोरवयीन मुलीस तीन नराधमांनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवल्याने शनिवारी खळबळ उडाली. ७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
निमापाडा तहसीलअंतर्गत बयाबार भागात हा प्रकार घडला. मुलीच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार, मैत्रिणीला पुस्तके देण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या या मुलीला तिघांनी अडवले. मुलीने विरोध केल्यावर या तरुणांनी तिला पकडून अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवून दिले.
आरोपी पळून गेले
तिन्ही तरुण मुलीस पेटवून पळून गेले. स्थानिकांनी पीडितेला उपचारासाठी भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस पथक गावात दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू आहे.
कठोर कारवाईचे निर्देश
ओडिशाच्या उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री प्रवती परीदा यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेला दुजोरा दिला आहे. पीडित मुलीवर एम्समध्ये उपचार सुरू असून त्याचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री परीदा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
ओडिशा महिलांसाठी असुरक्षित : पटनायक
मुलीला पेटवल्याच्या घटनेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात महिला सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. निष्क्रिय राज्य सरकारमुळे अशा प्रवृत्ती राज्यात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.