बघा, आम्ही मरतोय! दोन मुलांना फासाला लटकवून बापानं नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:51 IST2021-09-27T14:49:49+5:302021-09-27T14:51:31+5:30
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय; पतीनं दोन मुलांना फासावर लटकवलं

बघा, आम्ही मरतोय! दोन मुलांना फासाला लटकवून बापानं नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ
पत्नीच्या चारित्र्यावर सातत्यानं शंका घेणाऱ्या पतीनं त्याच्या दोन मुलांची हत्या केली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे पतीनं त्याच्या ९ आणि ५ वर्षांच्या मुलांची हत्या केली. पतीनं दोघांना झाडाला लटकवून संपवलं. या घटनेचा व्हिडीओ पतीनं नातेवाईकांना पाठवला. तमिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात हा प्रकार घडला.
मुरुगनचा (वय वर्षे ३३) विवाह मुरुगेश्वरीसोबत झाला होता. त्याला दोन मुलं होती. मोठा मुलगा ९, तर लहान मुलगी ५ वर्षांची होती. मुरुगन १३ वर्षांपासून एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. काम करतेवेळी काही दिवसांपूर्वीच मुरुगनला अपघात झाला. त्यामुळे तो १० दिवसांपासून घरीच होता. पत्नी कोणासोबत तरी बोलत असल्याचं त्यावेळी त्याच्या लक्षात आलं. याबद्दल आक्षेप घेत त्यानं बायकोला दम दिला. दुसऱ्या कोणासोबत बोलू नये अशी तंबी त्यानं बायकोला दिली.
रविवारी संध्याकाळी मुरुगन पत्नीचा फोन घेऊन जवळच्या दुकानात गेला. त्यानं दोन मुलांदेखील सोबत नेलं होतं. त्यानं त्याच्या दोन मुलांना तिथे झाडाला लटकवलं आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. 'तुम्हाला वाटतं होतं ना आम्ही मरावं. बघा आता आम्ही मेलो आहेत,' असं त्यानं व्हिडीओ चित्रित करताना म्हटलं. हा व्हिडीओ नातेवाईकांना पाठवून मुरुगननं आत्महत्या केली.
यानंतर मुरुगनची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी संगागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी एका आमराईतील एका झाडावर दोन मुलांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत सापडले. तिथेच मुरुगनचा मृतदेहदेखील आढळून आला. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.