पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळं नवविवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:25 IST2022-05-11T11:30:46+5:302022-05-11T15:25:47+5:30
Tamilnadu : राम्याने आपल्या पतीला राज्यातील राजधानीपासून जवळपास ४ तासांच्या अंतरावर कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यासाठी सांगितले होते. यावरून दोघांमध्ये बऱ्याचवेळा वाद झाले होते.

पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळं नवविवाहितेची आत्महत्या
कुड्डालोर : तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यातीत अरिसिपेरियनकुप्पम गावात एका २७ वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या घरी शौचालय नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील एका रुग्णालयात काम करणारी राम्या हिने गेल्या महिन्यात ६ एप्रिलला कार्तिकेयनसोबत लग्न केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर राम्या आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती, कारण तिच्या पतीच्या घरी शौचालय नव्हते. राम्याने आपल्या पतीला राज्यातील राजधानीपासून जवळपास ४ तासांच्या अंतरावर कुड्डालोर शहरात शौचालय असलेले घर शोधण्यासाठी सांगितले होते. यावरून दोघांमध्ये बऱ्याचवेळा वाद झाले होते. राम्याने सोमवारी आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, राम्याला आधी कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पाँडेचरीमधील जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅजुएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये (JIPMER) दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. राम्याची आई मंजुला यांनी तिरुपतीरुपुलियूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राम्या आणि कार्तिकेयन गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी गेल्या महिन्यात सहा एप्रिलला लग्न केले होते. लग्नानंतर राम्या कार्तिकेयनच्या घरी राहायला गेली. त्यावेळी तिला कार्किकेयनच्या घरी शौचालय नसल्याचे समजले. त्यानंतर राम्या लग्नानंतर आठवडाभरानंतर ती आपल्या आई-वडिलांच्या घरी परतली होती.
पोलिसांनी तिच्या आईच्या हवाल्याने सांगितले की, राम्याने तिच्या पतीला सांगितले की, शौचालय बांधल्यानंतरच ती त्याच्या घरी परत येईल. कार्तिकेयनने शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते, मात्र 6 मे रोजी राम्याची आई कामावरून परतली असता राम्याला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, तिचा मृत्यू झाला. राम्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही. मात्र तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, राम्या तिच्या पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळे खुश नव्हती, असे स्थानिक पोलिस निरीक्षक कविता यांनी सांगितले. तसेच, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचेही कविता यांनी सांगितले.