महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:42 IST2022-03-22T17:42:33+5:302022-03-22T17:42:55+5:30
बनावट फेसबुक अकाउंट काढून महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.

महिलेचे फोटो काढायचा अन् फेक Facebook अकाऊंटवर टाकायचा! पोलिसांनी अशी केली अटक...
लातूर :
बनावट फेसबुक अकाउंट काढून महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी लातूर येथे राहणाऱ्या एका महिलेचे फोटो आणि वैयक्तिक माहितीचा वापर करून अज्ञात आरोपीने खोटे बनावट फेसबुक अकाउंट काढून त्यावरून पीडित महिलेची बदनामी करून त्रास देत असल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, याबाबत पोलिसांनी तातडीने कलम ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश कदम आणि सायबर सेलने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासानंतर संतोष तुळशीराम बयवाड (रा. नांदेड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाइल आणि दोन सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून आणखी कोणत्या महिला-मुलींची फसवणूक केली आहे काय, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सपोनि. सूरज गायकवाड, पोलीस अंमलदार संतोष देवडे, शैलेश सुडे, गणेश साठे, प्रदीप स्वामी, राहुल दरोडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.