भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला; एका आरोपीला अटक तर ३ जण फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:06 IST2020-07-03T02:12:29+5:302020-07-03T07:06:45+5:30
नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये राहणारा प्रणव मिश्रा (२२) हा सोमवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास हायटेंशन रोडवर जात असताना त्याचा मित्र सलमान याचे चार जणांसोबत भांडण सुरू होते

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला; एका आरोपीला अटक तर ३ जण फरार
नालासोपारा : रस्त्यात सुरू असलेले मित्राचे भांडण सोडवायला जाणे नालासोपाऱ्यातील २२ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. चारही आरोपींनी त्याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केले असून तुळींज पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी एका आरोपीला अटक केले आहे, तर अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये राहणारा प्रणव मिश्रा (२२) हा सोमवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास हायटेंशन रोडवर जात असताना त्याचा मित्र सलमान याचे चार जणांसोबत भांडण सुरू होते. ते भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर प्रणववर पप्पू याने हातातील तलवारीने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. सलीमने लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण केली. नूर याने हातातील तलवारीने प्रणवच्या डोक्यावर वार केले व विजय थॉमस याने नूरच्या हातातून तलवार घेत प्रणववर हल्ला केला, पण त्याने तो चुकवला. प्रणवला त्या चारही जणांनी तलवारीने गंभीर जखमी केले.
घडलेल्या घटनेबाबत ३० जूनला चार आरोपींविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक केली आहे. तर, इतर तीन जणांचा शोध घेत आहोत. - डी.एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे