केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:31 IST2025-04-07T10:30:28+5:302025-04-07T10:31:07+5:30
३ मित्र परत तेल्हाऱ्याला निघून आले. मात्र प्रेम आणि त्याचा एक मित्र भुसावळमध्येच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रेमचा मृतदेह वरणगाव ट्रॅकवर सापडला.

केरळला कामासाठी निघालेल्या अकोल्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शंका
अकोला - केरळमध्ये काम करण्यासाठी निघालेल्या ५ मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतक प्रेम सारवान हा २६ वर्षाचा असून त्याचा मृतदेह ४ एप्रिलला जळगाव जिल्ह्यातील वरणगाव रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.
अकोल्याच्या तेल्हाऱ्यातील ३ तरुण आणि प्रताप चौकातील १ तरुण असे चौघे केरळला कामासाठी ३ एप्रिलला रवाना झाले. त्यांनी प्रेम सारवान याला सोबत येण्यासाठी संपर्क साधला. प्रेम अमरावतीहून भुसावळला पोहचला, जिथे रात्री जेवताना मित्रांसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर केरळला जाण्याचा प्लॅन रद्द झाला. ३ मित्र परत तेल्हाऱ्याला निघून आले. मात्र प्रेम आणि त्याचा एक मित्र भुसावळमध्येच राहिले. दुसऱ्या दिवशी प्रेमचा मृतदेह वरणगाव ट्रॅकवर सापडला.
घातपाताचा संशय
मृतदेहाजवळ त्याच्या मित्राचा मोबाईल सापडला. मात्र मित्र तिथे नव्हता. प्रेमच्या खिशात बडनेराकडे जाणाऱ्या गाडीचे तिकीट सापडले म्हणजे तो परत जाणार होता. या घटनेत मृतकाच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी लागेल असं सांगण्यात आले.
प्रेम सारवानचे वडील केरळमध्ये बेकरीत काम करतात, तर त्याच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. प्रेमचे लग्न झालेले असून तो अमरावतीतील सासरवाडीत राहायचा. मृताच्या नातेवाईकांनी याला आत्महत्या मानण्यास नकार दिला असून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी सखोल तपास करून सत्य समोर आणावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.