आईचा एक कॉल अन् पोलिसांनी जमिनीतून उकरून काढला १ वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:10 IST2025-03-13T14:10:18+5:302025-03-13T14:10:30+5:30

पती विकास वळवी यांचं कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप पत्नीने केला आहे.

Suspicious death of 1-year-old girl in Makhmalabad, Nashik, father under suspicion after mother's call to police | आईचा एक कॉल अन् पोलिसांनी जमिनीतून उकरून काढला १ वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह

आईचा एक कॉल अन् पोलिसांनी जमिनीतून उकरून काढला १ वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह

नाशिक - पंचवटीच्या मखलमाबाद शिवारात एका शेतात खेळताना पाय घसरून विहिरीत पडून १ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत पावलेल्या बालिकेच्या मृतदेहाचा पित्याने परस्पर दफनविधी केला. यामुळे आईने मुलीचा घातपाताची संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पंचाच्या उपस्थितीत वैष्णवी वळवी या चिमुकलीचा मृतदेह पुन्हा स्मशानभूमीतून उकरून काढण्यात आला.

वैष्णवी एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीत पडली होती. तिच्या पालकांनी शोध घेतला असता दीड तासानंतर विहिरीत पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतमजुरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून खासगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यास सांगितले. आई माहेरी गेलेली असल्यामुळे तिला येण्यास उशीर होणार असल्याचं वडील विकास वळवी यांनी घाईघाईत वैष्णवीचा मृतदेह स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेत पुरून टाकला. याबाबत म्हसरूळ पोलिसांना कुठलीही माहिती कळवण्यात आली नाही. 

आईचा कॉल अन् समोर आला प्रकार

वैष्णवीचे आई वडील शेतमजूर आहेत. या दाम्पत्यामध्ये वाद सुरू असल्याने मुलीला आणि नवऱ्याला सोडून आई माहेरी निघून गेलेली होती. पतीने मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची खबर दिल्यानंतर आईने मखमलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी धाव घेत मंगळवारी ११२ क्रमांक फिरवून पतीने मुलीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती कळवली. पती विकास वळवी यांचं कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप पत्नीने केला आहे.

दरम्यान, वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. या अर्जाबाबत कोर्टाने सरकारी पक्षाचे म्हणणं ऐकून घेत तहसीलदारांना आदेश दिले. २ दिवसांपूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला असून तिला जमिनीत पुरून अंत्यविधी करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढत जिल्हा रूग्णालयात पोस्टमोर्टमला पाठवला. या चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Suspicious death of 1-year-old girl in Makhmalabad, Nashik, father under suspicion after mother's call to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.