खळबळजनक! १ महिन्यापूर्वीच मुंब्य्रात राहायला आला होता संशयित दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 21:08 IST2021-09-19T21:07:18+5:302021-09-19T21:08:55+5:30
The suspected terrorist : याआधी मुंबई एटीएसने नागपाड्यातून झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. त्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली.

खळबळजनक! १ महिन्यापूर्वीच मुंब्य्रात राहायला आला होता संशयित दहशतवादी
एटीएसने मोठी कारवाई करत मुंब्र्यातील चांद नगर येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. रिझवान इब्राहिम मोमीन असं या संशयित दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. कौसा मुंब्रा येथील चांद नगर येथील अवोन नूरी रेसिडेन्सीमध्ये रिझवान हा एका महिन्यापासून राहत होता. तसेच तो क्लासेस देखील घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याआधी मुंबई एटीएसने नागपाड्यातून झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. त्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचा कट रचत होते. या अलर्टनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर सर्व गेट्स बंद करण्यात आले. त्यात एटीएसनं रिझवान इब्राहिम मोमीन उर्फ इमरान उर्फ मुन्नाभाईला अटक करुन कोर्टात हजर केले.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. त्यावेळी ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत जोगेश्वरी येथून एका संशयिताला पकडलं होतं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जाकीरनं पकडलेल्या दहशतवादी मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याच्याकडून हत्यारं आणि स्फोटकं घेतली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत मुंबई-दिल्ली एटीएस टीम देशभरात छापेमारी करत छुप्या दहशतवाद्यांना अटक करत आहे.
महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.