Suspected accused arrested for murdering a man | साधुच्या वेशातील एका इसमाच्या खुनाचा गुंता सुटला, संशयित आरोपी अटकेत 
साधुच्या वेशातील एका इसमाच्या खुनाचा गुंता सुटला, संशयित आरोपी अटकेत 

 मडगाव - गोव्यातील मडगाव शहरात मागच्या आठवडयात घडलेल्या एका खून प्रकरणाचा गुंता सुटला असून, पोलिसांनी या खून प्रकरणात अमजद खान उर्फ निग्रो (१८) याला अटक केली आहे. पैशासाठी हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. संशयित मूळ कर्नाटकातील मंडया येथील रहिवाशी असून, तो भंगारगोळा करण्याचे काम करतो. शुक्रवारी रात्री रेल्वेतून आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी तो रेल्वे स्थानकावर आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सीसीटिव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस खुन्यापर्यंत पोहचू शकले.

संशयिताला अटक केली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.
मंगळवारी रात्री मालभाट येथील यल्लम्मा घुमटीजवळ खुनाची घटना घडली होती. बुधवारी सकाळी तेथे साधुच्या वेशातील एक इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ दारुची एक बाटलीही सापडली होती. खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरु केला असता, एका युवकाने मयताच्या डोके दगडाने चेपल्याने हा खून झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तपास चालू करुन शुक्रवारी रात्री संशयित अमजद याला पकडले. त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

संशयिताला पैसे पाहिजे होते. पहाटे साडेचारच्या दरम्यान तो फिरत यल्लम्मा घुमटीजवळ पोहचला असता, तेथे त्याला साधुच्या वेशात एक इसम सापडला, त्याच्याकडे पैसे मागितले असता, त्याने नकार दिला. नंतर चिडून त्याने दगडाने त्याचे डोके चेपले व पैसे घेउन तो पळून गेला. संशयिताला व्हायटनर द्रव्य हुगंण्याचे व्यसन आहे असे पोलिसांनी सांगितले. संशयित रेल्वे स्टेशन परिसरात रहात होता. खुनाच्या घटनेनंतर तो दोन दिवस याच भागात होता. नंतर शुक्रवारी रात्री तो कोकण रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर रेल्वेतून गावी जाण्यासाठी आला असता, एलआयबी पोलीस पथकाचे पोलीस गोरखनाथ गावस यांनी त्याला पकडले. या खूनाचा सीसटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून माग काढण्यासाठी पोलीस शिपाई अविनाश नाईक यांनीही मोलाची कामागिरी केली अशी माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

दरम्यान या खून प्रकरणातील मयताची ओळख अजूनही पटू शकली नाही. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.
 

Web Title: Suspected accused arrested for murdering a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.